Subscribe:

Labels

Nov 17, 2010

Blank Call - Sandeep Khare

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन...

0 comments:

Post a Comment